हिंदू समाज त्याच्या संपूर्ण इतिहास काळात आक्रमकांशी संबंध आलेला समाज आहे. इ. स. पू. दोन हजार वर्षांपासून त्याच्या ज्ञात इतिहासात या आक्रमकाशी संघर्षाच्या आणि त्याच्याशी केलेल्या समझोत्याचा तपशील आहे. या ठिकाणी हिंदू समाज हा शब्द भौगोलिक अर्थाने म्हणजेच उत्तरेकडील सिंधू नदीपासून ते दक्षिण सागरापर्यंतच्या प्रदेशात वस्ती करून राहिलेला समाज या अर्थाने वापरलेला आहे. आर्यपूर्व काळातील या हिंदू समाजाची व्यवस्था आणि त्याच्या जीवनाबद्दलचे, समाजाबद्दलचे आणि निसर्गाबद्दलचे चिंतन आणि त्यातून होणारे धर्मचिंतन या दोहोत कालौघात सतत परिवर्तन झालेले दिसते. या हिंदू समाजाने आर्यांशी निकराचा संघर्ष केला. परंतु आर्यांच्या रानटी शक्तीपुढे त्याचा टिकाव लागू शकला नाही. या हिंदू समाजाचे मूळचे घटक दास, दस्यू आणि पणी यानी आर्यांशी अतिशय निकराने सामना केला, त्यात त्यांना यश आले नाही. त्याचा तपशील आपल्याला ऋग्वेदात मिळतो.