राज्यकर्ते मोगल असो की निजाम अथवा अन्य कोणी, पण देवगिरी जिंकण्यासाठी कठीणच, ती जबाबदारी निजामशहाने लखुजीराजे जाधवांवर सोपवली. जेथे शक्ती हात टेकते, तेथे युक्ती श्रेष्ठ ठरते ! जीवनावश्यक वस्तुंचा प्रचंड साठा करून ठेवण्याची क्षमता या किल्ल्याची आहे. येथे फक्त चारा टंचाई होते. अशावेळी 'शहनाई' वाजवली जाते. तेव्हा गवताचे व्यापारी गवत घेऊन गडावर जात असतं. ही बाब लखूजींनी हेरली व गडाभोवती आपली विश्वासू माणसं पेरली. 'तो' शहनाईचा आवाज होताच, गवताच्या भाऱ्यात हत्यारे लपवून लखूजींची माणसं गडावर घुसली, वर जाताच लखूजींच्या आदेशाप्रमाणे मुंडकेछाटणी सुरू झाली. आकस्मिक हल्ला मोगलांना परतवता आला नाही. त्यांनी हार पत्करली. विजयाची माळ निजामशहाने लखूजींच्या गळ्यात घातली. म्हणून देवगिरी राष्ट्रकुटांनी बांधला असला, तरी तो यादवांच्या नावानेच ओळखला जातो.