दुःखाचे, संकटांचे, अन्याय, हाल-आपेष्टांचे दिवस कुठल्याच महापुरुषाला आणि वीरमातांना चुकले नाहीत. सगळ्यांच्या वाट्याला अडचणींचे डोंगर आडवे आले. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, रमाई आंबेडकर, कान्होपात्रा, येसूबाई यांची चरित्रे यातनांच्या महापुराने विळखा घातलेली दिसतील. आपल्या व्यक्तिगत सुखापेक्षा आणि दुःखापेक्षा त्यांनी समाजाचे दुःख समजून घेतले. कसा असेल एक एक दिवस जिजाऊंच्या जगण्यातला ? आनंदी, सुखाचा, ऐष-आरामाचा. पायावरती सुखं लोळण घेतातय असा ? असं आणि एवढं सोपं होतं का त्यांचं जगणं ? अजिबात नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी तर स्वतः राज्यकारभार सांभाळला. संकटं उभी राहिली म्हणून अडचणीच्या वेळीच त्या सरसावून उभ्या राहिल्या ना? हा परीक्षेचा काळच माणसाच्या मनगटाला आणि कर्तृत्वाला आकार देत असतो. या परीक्षेला पुरून उरणारी माणसंच मनगटाच्या जोरावर काळाला आकार देत असतात. ही सर्व महान कर्तृत्ववान चरित्रे म्हणजे समस्त समाजाला आणि त्या त्या काळाला आकार देणारी आणि घडविणारी चरित्रे आहेत.