स्त्रीमुक्तीच्या युद्धगाथा' रचणाऱ्या डॉ. आनंद इंजेगावकर यांचे मी सानंद अभिनंदन करतो. स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात ढकलल्या गेलेल्या स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी पारतंत्र्याचा तुरुंग उद्ध्वस्त करणारा पायाभूत संग्राम भारताच्या इतिहासात सुरू आहे. हा सर्व इतिहासपट या पुस्तकात लेखकाने ताकदीने उभा केला आहे.
मेहरगड, मेलुहा, सिंधू या नावांनी भारतात श्रमणसंस्कृती मुक्तपणे नांदली. ही इहवादी आणि सममूल्यवादी संस्कृतीच खरी भारतीय संस्कृती आहे. ही भारतीय संस्कृतीच आपल्या संविधानात आहे. श्रमणसंस्कृतीत अनेक गणतंत्रे होती. निऋति ही त्यातीलच एका गणतंत्राची नायिका होती. ही गणतंत्रे लोकशहीमयही होती आणि स्त्रीपुरुषसमभावीही होती. या संस्कृतीत सर्वमय समतोल होता. इ. स. पूर्व तीन हजारमध्ये आलेल्या वैदिकांनी या सभ्यतेची वाताहत केली.
वैदिकांनी आपल्या वर्चस्वासाठी चातुर्वर्ण्य निर्माण केले आणि श्रमणस्त्रियांना सूडबुद्धीने शुद्र केले. खाजगी मालमत्तेच्या उदयाने स्त्रीला दास केले. ही तिच्या मानवी सन्मानाचीच हत्या होती. स्वतंत्र माणूस जन्माला घालील या भयाने वैदिकांनी प्रथम स्त्रीचे मन गुलाम केले आणि तिची सर्वश्रेष्ठ सर्जनशीलता जाती आणि दास जन्माला घालण्यासाठी वापरली.
हा स्त्रीच्या समृद्ध स्वातंत्र्याचाही खून होता आणि तिच्या दास्याचाही काळा उदय होता. स्त्रीच्या पारतंत्र्याचा हा तुरुंग भुईसपाट करण्यासाठी लोकायत आणि बुद्धापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि भारतीय संविधानापर्यंत एक महासंग्राम धगधगत आहे.
या युद्धाच्या गाथा आनंद इंजेगावकर यांनी या पुस्तकात साक्षात केल्या आहेत. या पुस्तकात वाचकांना स्त्री स्वातंत्र्याची चळवळही वाचता येईल आणि भारतीय स्त्रीवादही वाचता येईल