रामायणाचा नायक असलेल्या रामाविषयी कोणती भूमिका घ्यायची, याविषयी आपल्या समाजात गेली दोन-सव्वा दोन हजार वर्षे उलटसुलट चर्चा चालू आहे. रामाबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. काही लोक आणि विशेषतः पुरोगामी चळवळींतील लोक 'अन्यायी राजा' म्हणून त्याच्यावर कठोर टीका करतात. याउलट, बहुसंख्य लोक त्याच्याविषयी नितान्त श्रद्धा बाळगतात. शिवाय, विशिष्ट विचारसरणीचे लोक त्याच्याविषयी मनात अशी श्रद्धा नसूनही बहुजनातील त्याच्या लोकप्रियतेचा लाभ घेण्यासाठी आणि समाजावरील आपले वर्चस्व टिकविण्यासाठी त्याच्या नावाचा दुरुपयोग करतात. अशा प्रकारचे विविध विचारव्यूह आपल्या आजूबाजूला असताना आणि काही जण माझ्या या विषयावरील भूमिकेविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत असताना, रामाविषयी माझी नेमकी भूमिका कोणती, हे सुस्पष्ट करण्याची गरज आहे, असे वाटल्यामुळे मी हे लेखन आपल्या हाती देत आहे.