प्राचीन काळापासूनच जगभरातील कोट्यवधी लोकांवर बुद्धांच्या विचारांचा प्रभाव पडलेला आहे आणि त्या विचारांनी त्यांचे आयुष्य आरपार बदलून गेले आहे. वर्तमानकाळातही जगभरच्या विविध देशांतील संशोधक बुद्धांच्या एकूण विचारांवर आणि खास करून कालामसुत्तावर संशोधन, चिंतन करीत आहेत.
मी प्रस्तुत पुस्तकात अशा काही विद्वानांची कालामसुत्ताविषयीची मते उद्धृत करून त्यांचे संक्षिप्त विवेचन केले आहे. भारतातील विद्वान तर आहेतच, पण भारतापासून नेपाळ - सिंगापूरपर्यंत, श्रीलंकेपासून थायलंडपर्यंत, चीनपासून अमेरिका-कॅनडापर्यंत, नीदरलँडपासून स्पेनपर्यंत आणि जर्मनीपासून रशियापर्यंत विविध तज्ज्ञांची, संशोधकांची मते यामध्ये अंतर्भूत आहेत. यावरून कालामसुत्ताचा आजही जगभर किती व्यापक प्रभाव आहे, हे दिसून येते.
ज्यांना कालामसुत्त जसे दिसले, जसे समजले, तसे त्यांनी आपापल्या पद्धतीने मांडलेले आहे. हे एक प्रकारे कालामसुत्ताचे 'विश्वरूपदर्शन' आहे.