भटक्या-विमुक्त समाजाचा इतिहास हा संघर्षाचाइतिहास आहे. ब्रिटिश राजवटीने या समाजावर लादलेला गुन्हेगारीचा कलंक कायद्याच्या पुस्तकातून पुसला गेला. मात्र समाजव्यवस्थेच्या मनातून तो पूर्णतः पुसला गेला, असे आजही म्हणता येत नाही. स्वातंत्र्य, समता आणि न्यायाची घटनात्मक हमी मिळाल्यानंतरही भटक्या-विमुक्त समाजाला आपल्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी आणि हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करावा लागला आहे.
म्हणूनच, एखाद्या समाजाचा इतिहास लिहिला गेला नाही, तर कालांतराने त्याचा संघर्ष विस्मृतीत जाण्याचा धोका असतो. भटक्या-विमुक्त समाजाने आपला इतिहास, आपल्या पूर्वजांचा संघर्ष, आपली संस्कृती, आपले ज्ञान आणि आपल्या वर्तमानातील प्रश्न स्वतःच्या आवाजात नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 'विमुक्तांची पंचाहत्तरी' हे पुस्तक त्या दिशेने केलेला एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.
मला अपेक्षा आहे, की हे पुस्तक केवळ भटक्या- विमुक्त समाजापुरते मर्यादित राहणार नाही. अभ्यासक, कार्यकर्ते, विद्यार्थी, धोरणकर्ते आणि सामाजिक न्यायाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने या इतिहासाकडे समजून घेण्याच्या दृष्टीने पाहावे. कारण भटक्या-विमुक्तांचा प्रश्न हा केवळ एका समुदायाचा प्रश्न नसून तो भारतीय लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधानाने दिलेल्या समतेच्या आश्वासनाची कसोटी आहे.