गोष्ट साधी सरळ आहे; आम्हांला स्वतंत्र माणूस म्हणून जगायचे आहे. आम्हांला कुणाशी भांडण करण्याची वा वाद घालण्याची हौस नाही. आम्ही स्वतःहून कुणाच्या वाटेला जाऊ इच्छीत नाही. आम्हांला आपले आमच्याच वाटेने जायचे आहे. आता, आमच्या या वाटेवर जेव्हा काटेकुटे आढळतात, तेव्हा ते बोचू नयेत म्हणून, आमच्या पायात घुसू नयेत म्हणून, ते बाजूला करणे भागच आहे. रस्त्यात जेव्हा काही दगडधोंडे येतात, तेव्हा ठेच लागू नये म्हणून ते दगडधोंडे बाजूला करावेच लागतात. वाटेत खाचखळगे आले, तर पाय खड्ड्यात जाऊन तोंडावर आपटण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून ते खाचखळगे बुजवावेच लागतात. आम्ही एवढेही करू नये, असे ज्यांना वाटते, त्यांनी आमच्याबरोबर भांडण उकरून काढले, तर आम्ही काय करावे ? ते म्हणतील, की आम्ही गप्प बसावे, किंवा पळून जावे. आम्ही म्हणतो की आता आम्ही असे करणार नाही. आता आम्ही प्रतिहल्ला चढवू !