श्री. राजेंद्र घाडगे यांनी कळत नकळत एक अभिनव पद्धतीचे शाहूचरित्र वाचकांना पेश केले आहे. हा चरित्रग्रंथ नेहमीच्या धाटणीतील नाही आहे, म्हणजे घटनानुक्रमे रचलेला नाही. राजर्षी शाहूंच्या जडणघडणीचा आवश्यक तो वृत्तांत पहिल्याच प्रकरणात देऊन ते रुळलेल्या वाटेने न जाता शाहूमहाराजांच्या विचारांच्या बाजूने त्यांचे चरित्र सांगताहेत. शेवटी चरित्र म्हणजे जन्म-मृत्यूची प्रकरणे नव्हेत. चरित्र म्हणजे त्या व्यक्तीचे विचार व ते अंमलात आणण्यासाठी त्याने केलेली वाटचाल या दृष्टीने विचार करता श्री. घाडगे यांनी शाहूचरित्र लेखनक्षेत्रात या चरित्राच्या रूपाने एक अभिनव प्रयोग केलेला आहे.
श्री. राजेंद्र घाडगे यांनी आपल्या या चरित्रग्रंथात राजींचे अनेक विचार एकत्र गुंफून त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या प्रजाहितदक्षता, दीनदुबळ्यांविषयींची कणव, रयतेच्या हिताची कळकळ, पददलित, विशेषतः अस्पृश्य समाजाचा उद्धार करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, अफाट बुद्धिमत्ता, प्रतिपक्षावर मात करण्याची मुत्सद्देगिरी, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील त्यांची प्रयोगशील वृत्ती, स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचे पुरोगामित्व अशा अनेक गुणांचे दर्शन त्यांनी प्रस्तुतच्या चरित्रग्रंथात घडविले आहे.
खरे तर शाळेमधील प्रत्येक शिक्षकाने हा ग्रंथ वाचून त्यातील विचारांचे संस्कार आपल्या विद्यार्थ्यांवर केले पाहिजेत. त्या दृष्टीने हे चरित्र प्रत्येक शाळेत गेले पाहिजे. त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मला वाटते.