लेखकाने स्वतःची भाषा वापरावी. तिचा डौल, तिचा घाट, थाट हे सगळं त्या, त्या लेखकाचं असावं. अनुकरण करणे हे काही योग्य नाही. म्हणजे जन्मणारे नवजात बाळ जसे आपले रंग रूप घेऊन जन्माला येतं, तसंच लेखनही असावं, म्हणजे त्याची स्वतःची ओळख निर्माण होते. पण त्यासाठी अनुभवांची शिदोरी मात्र मोठी लागते. मूर्त-अमूर्त जगाची ओळख लागते. समाजातील अनेक घटकांशी तुमची एकरूपता पाहिजे. तर आणि तरच आपल्याला शब्द कळतो आणि एकदा शब्द कळला, की तो आपलासा होतो. आपलासा झाला की मग त्याला हवं तसं वळवता येतं. हवं तसं पळवता येतं. रुजवता येतं. तो एकदा रुजला, कोंबारला, की त्याला अनेक धुमारे फुटतात. त्याचेच प्रास, अनुप्रास, यमक, छंद, वृत्त होतात. ओळींचे झरे, मजकुराची कारंजी उडू लागतात. विचार आकाराला येतो. म्हणून अगोदर शब्द समजला पाहिजे, मग त्याच्यावर आपल्याला अनेक प्रकारचे कशिदे काढता येतात, तर कधी ऊरफोड घुसमटही मांडता येते. कथाकार श्री. सुभाष गुरव यांनी या संग्रहात घुसमट मांडली आहे, हे ठामपणे म्हणता येईल