कितीतरी असं मनातल्या मनात राहून जातं. काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं... मात्र ते कधी ओठावर येत नाही.. कृतीत उतरत नाही. अव्यक्त राहून जातं, अबोल होऊन जातं. मनाच्या धुळीत उमटलेली अक्षरे वाचायची राहून जातात, कुणीतरी कधीतरी दिलेली मोरपिसं कुठल्यातरी वहीत पडून राहतात. कधी काळी ठेवलेली पिंपळ पानाची जाळी पहायची राहून जाते. खूप काही डोळ्यातल्या डोळ्यातच विरून जातं... पाहिलेलं स्वप्नही मरून जातं... कितीही फुले जमविली तरी तो धुंदी सुवास पकडता येत नाही.. निसटून जातो तो कायमचा. म्हणून इंद्रधनुष्य आभाळात फुलून येते, तेव्हाच ते काळजात खोलवर पसरून घ्यावे. दुःखाने उन्मळून गेलो, की धायमोकलून रडून घ्यावे... मनाच्या आतपासून बाहेरपर्यंत सडा घालून रांगोळ्यांनी सजवावी काळजातील अंगणे. अत्तर शिंपडून लावीत राहावे आकाशदीप रोज दिवाळी आहे समजून... एखाद्यावर जीव लावतानाही त्यावर असा जीव ओतावा की आपल्याला फसवतानाही त्याला लाज वाटावी. काही सोडायचे असेलच तर मनापासून उकलून काढावे, साल काढावी तसे आणि करून द्यावे मोकळे त्याचे त्याचे आभाळ ज्याचे त्याला..... सगळ्या भावना चाखीत, रडत, पडत, कोसळत, उसळत, वीज होत, पाणी होत, सावली होत, अथांग होत जाणिवेच्या काठावर तरंगत रहायचे.... विसरून जायचे माणूसपण आणि त्याच्या मर्यादा....