डॉ. लहाने यांनी 'भारत-ब्रिटिश संबंध' या संशोधनात्मक ग्रंथात भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक इ. प्रदीर्घ ऐतिहासिक घटना व प्रसंगांची मालिका उलगडणारे लेखन केलेले आहे. या लेखनाला वाचन, चिंतन, मनन आणि तर्कदृष्ट्या विचारांची खोली लाभलेली आहे. भारतीय समाजव्यवस्थेचे आकलन आणि भान सखोलपणे या ग्रंथातून प्रतिबिंबित झालेले आहे. हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणून अग्रक्रमाने विचारात घ्यावे लागेल.
भारत आणि ब्रिटन यांच्या संबंधांकडे तटस्थपणे पाहण्याची एक डोळस दृष्टी लहाने यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे या लेखनाला वस्तुनिष्ठतेबरोबर एक वैचारिकताही प्राप्त झालेली आहे. इतिहासाच्या पूर्वसुरी लेखनाकडे ते प्रभाव अथवा अनुकरणाच्या भूमिकेतून न पाहता तटस्थपणे पाहतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाला एक स्वतंत्र ऐतिहासिक लेखनाची शैली प्राप्त झालेली आहे. नव्या पिढीतील सक्षम इतिहासशास्त्राचे अभ्यासक म्हणून पहावे इतके त्यांचे लेखन सक्षम आणि सशक्त आहे. त्यांचा प्रस्तुत ग्रंथ इतिहासाच्या नव्या अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल यात शंका नाही...