खेड्यापाड्यातली कुठलीच गोष्ट आज राजकारणविरहित राहिलेली नाही. शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रही त्याला अपवाद नाही. जिथून उद्याच्या समाजाची पायाभरणी केली जाते, त्या मूलभूत पायालाच राजकारणाची वाळवी लागली आहे आणि तिने इथली मूल्यव्यवस्था कशी मुळातूनच पोखरली आहे, याचे भेदक दर्शन बाळासाहेब कांबळे यांच्या 'भिनवाडा' कादंबरीत घडते.
सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातला, अनेक स्वप्नं उराशी बाळगलेला एक ध्येयवादी तरुण प्राथमिक शिक्षकाच्या नव्या नोकरीसाठी कोयना धरणाच्या बॅक वॉटरच्या पट्ट्यातल्या निसर्गसंपदेने समृद्ध अशा एका दुर्गम गावात जातो. तिथल्या कोवळ्या जिवांच्या उज्वल भविष्यासाठी जीव ओतून धडपडतो. त्याची ही धडपड गावातल्या राजकीय धेंडांच्या हितसंबंधाआड येते. त्यातून अनपेक्षितपणे उभा राहिलेला संघर्ष हा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. शिक्षकाच्या प्रामाणिक धडपडीचा सोयीस्करपणे राजकारणाशी संबंध जोडला जातो. गावपातळीवरच्या विकृत राजकारणाचा हा शिक्षक बळी ठरतो आणि नोकरीचे गाव त्याला सोडावे लागते. या अवकाशात ही कादंबरी घडते. कादंबरीतल्या शिक्षकाचा संघर्ष हा प्रतीकात्मक असला तरी आजच्या घडीला खेड्यापाड्यात ज्ञानदान करणाऱ्या सर्वच प्रामाणिक शिक्षकांना तो लागू पडतो.