या पुस्तकाच्या निर्मितीचा आनंद खूपच आल्हाददायक आहे. माझ्या आयुष्यातील पुस्तकरूपाने प्रकाशित होणारी ही पहिलीच साहित्यकृती आहे. या पुस्तकात बुद्धविचार संकलित केले आहेत. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या 'सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध' या पुस्तकातून सुविचार घेतले आहेत. बुद्धांचे समग्र विचार असे या पुस्तकाचे स्वरूप नसून फक्त 'सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध' मधील निवडक विचार संकलित केलेले आहेत. तथागत बुद्धांचे मूळ विचार व त्यावर डॉ. आ. ह. साळुंखे यांचे चिंतनात्मक मौलिक भाष्य अशा दोन विभागांत संकलन आहे.
बुद्धांकडे पाहण्याचा भारतीयांचा विशेषतः महाराष्ट्रीय लोकांचा दृष्टिकोण तितकासा स्वच्छ व स्पष्ट नाही. बुद्ध हे व्यक्तिमत्त्व बहुतांश लोकांना जवळचे वाटत नाही. असे असले, तरी डॉ. साळुंखेंच्या मते बुद्धांच्या हृदयाशी प्रत्येकाचे हृदय जोडलेले आहे. कुणाचे दृश्य स्वरूपात असेल, तर कुणाचे अदृश्य स्वरूपात. बुद्ध हा आपला नाही, बुद्धांचे आणि आपले काहीही देणे-घेणे नाही, कदाचित बुद्ध हा आपला शत्रू असेल, तो परका असेल, असा गैरसमज बऱ्याच लोकांनी करून घेतला आहे.
'सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध' हे पुस्तक वाचल्यानंतर हे सगळे गैरसमज दूर होतात. आपले बुद्धांशी, बुद्धविचारांशी एक हृद्य नाते आहे, हा दृष्टिकोण पक्का होतो. याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. असाच तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे, यात शंका नाही.