मस्तानी म्हणजे ठेवलेली स्त्री. ती बाजीरावची रक्षा, उपस्त्री होती, अशी तिची प्रतिभा रंगवून विरोधकांनी तिच्या निसर्गदत्त स्त्रीत्वाचाच अपमान केला आहे. माणूस म्हणून महत्त्वाचे असलेले जीवनमूल्य तिला नाकारण्याचा प्रयत्न आकसाने तिच्या विरोधकांनी केला, परंतु हे संबंध तसे नव्हते. आरंभी तिच्याविषयी लिहिणाऱ्या इतिहासकारांनीही मस्तानीला ऐहिक इतिहासातील व्यक्ती म्हणून तिच्याविषयी जोरकसपणाने लिहिले नाही. वास्तविक पाहता बाजीरावासारख्या सेनानीने लग्नाशिवाय एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवणे तत्कालीन समाजाला मान्य होते, परंतु बाजीरावाने असे केल्याचे कोणतेही संदर्भ इतिहासात नाहीत. तरीही मस्तानीच्या बाबतीत मात्र पेशवे कुटुंबीयांकडून बाजीरावाला प्रचंड विरोध झाला होता. त्याचे कारण मस्तानी परमुलखातली, भिन्न र्मनिष्ठा असलेली होती, हेच होते.