भारताची विशेषतः महाराष्ट्राची आजची सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक परिस्थिती पाहिल्यानंतर मन सुन्न होते. हृदयात ज्वाला पेटून उठतात अशा अवस्थेत गाढ झोपी गेलेल्या महाराष्ट्राला कोण जागे करणार? समाज सुधारणेचा बुरखा तोंडावर घेऊन समाजात प्रतिष्ठेने वावरणाऱ्यांचा नकली बुरखा फाडून टाकून त्यांचे सत्य स्वरूप समाजाला कोण दाखविणार? देवा धर्मांचे स्तोम माजवून धर्मभोळ्या आडाणी व अज्ञानी लोकांचा गैरफायदा घेणाऱ्यांचे वस्त्रहरण कोण करणार? असे नाना प्रश्न माझ्यापुढे उभे राहतात. तेव्हा या सर्व प्रश्नांच्या विरोधी बंड पुकारून उठणारा, देव, धर्म, रूढी आणि परंपरा यांच्यावर तोफा डागणारा, आपल्या क्रांतीकारी विचाराने आख्या महाराष्ट्राला खडबडून जागे करणारा आणि महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला धडाडीचा कार्यकर्ता, की ज्याच्या कार्याची आख्या महाराष्ट्राने थोरवी गायिली आहे, असे महान क्रांतीकारक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या समाज क्रांतीकारी विचारांचे स्मरण होते. 'सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती फोल आहे हा माझा मनोमन रूजलेला सिद्धांत आजही कायम आहे यावर त्यांची दृढ श्रद्धा होती, की ज्या क्रांतीचा पुरस्कार जोतीराव फुल्यांपासून ते डॉ. आंबेडकरांपर्यंतच्या सर्वच सुधारकांनी केला होता. कारण सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती वांझ आहे. निरोगी, निकोप आणि सुदृढ बालकास जन्म देण्यासाठी गर्भाशयामध्ये त्या बालकाची वाढ पूर्णपणे होणेच आवश्यक आहे हे प्रबोधनकारांनी अचूक ओळखले होते. आपल्या प्रबोधनाचे ध्येय स्पष्ट करतानाते म्हणतात....