डॉ. विठ्ठल पिराजी भंडारे हे सामाजिक चळवळीतील एक संघर्षमय व्यक्तिमत्त्व. सामाजिक न्यायासाठी संघर्षाचा पवित्रा घेणारं नेतृत्व. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी जवळपास चार दशकापासून त्यांनी संघर्षाच्या अनेक चळवळी गतिमान केल्या आहेत. ते ज्या समाजात जन्मले त्या मातंग समाजाला वैचारिकतेची दिशा देत त्यांनी या समाजाचे निरंतरपणे उद्बोधन व प्रबोधन करीत आहेत. समाजाच्या बाहेर जाऊनही त्यांनी समाजातील सर्व जाती, धर्माच्या लोकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी ते सातत्याने सक्रीय राहतात. संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव बनलेला आहे. शिक्षक पदाची सेवा करीत करीत त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक सेवाही नेत्रदीपक आहे. निःस्पृह व निःस्वार्थ हा त्यांच्या सेवेचा गुणधर्म आहे. क्रांतिगुरू लहूजी साळवे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास, संत गाडगेबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णा भाऊ साठे यांसारख्या अनेक महापुरुषांच्या विचारांची पेरणी त्यांनी अनेक गावागावांत केली. म्हणूनच डॉ. विठ्ठल भंडारे हे समग्र परिवर्तनाचे भाष्यकार म्हणून सर्वत्र परिचित आहेत. शिक्षक, समाजसेवक, लेखक, समीक्षक आणि संशोधक म्हणूनही त्यांनी आपली निर्णायक भूमिका बजावताना दिसून येतात.