प्रा. अर्जुन जाधव यांच्या 'देवगिरीचे यादव ऊर्फ जाधव' या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे आहे की, आत्तापर्यंतचा यादवांचा इतिहास शंकरदेव किंवा हरपालदेवाच्या पुढे जात नव्हता. या घराण्याची यादव ऊर्फ जाधव म्हणून पुढील परंपरा गोविंददेवापासून ते लखुजी जाधवापर्यंत म्हणजेच इ. स. १३२४ ते १६२९ पर्यंतच्या इतिहासाची सूत्रबद्ध व वास्तवदर्शी मांडणी करून लखुजींच्या ऐतिहासिक कार्यातून स्वराज्याचे बीजारोपण कसे झाले ? लखुजीने स्वपराक्रमावर 'सिंदखेडराजा' जहागिरीचे राजवैभव कसे प्राप्त केले ? तसेच लखुजी जाधवांच्या गुणवैशिष्ट्यांचे यथार्थ केलेले विश्लेषण स्वराज्य बांधणीस कसे सहाय्यभूत ठरले, याचा साद्यांत लेखाजोखा विविध ऐतिहासिक पुराव्यांच्या आधाराने प्रस्तुत केला आहे. लखुजी स्वराज्य संस्थापक होऊ शकले नाहीत, त्यांची प्रकृती परधार्जिणी होती. त्यांनी समाजहित आणि सुधारणावादी धोरण आपल्या जहागिरीत राबविले. स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ ही लखुजी जाधवांची कर्तबगार कन्या होती. मातोश्री जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली आणि आपल्या पित्याचे आणि पतीचे स्वप्न पुत्राच्या माध्यमातून साकार केले. इतिहासकार डॉ. संतोष बाहेकर म्हणतात त्याप्रमाणे, 'जिजाऊला स्वराज्य स्थापनेची वैचारिक प्रेरणा जाधव घराण्याच्या गौरवशाली इतिहासातूनच प्राप्त झाली आहे.'