डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हवा होता सर्वांगीण विकास. कारण सर्वांगीण विकासातूनच सर्व समाजघटकांचा विकास होऊ शकेल. मजुरांच्या हातांना काम मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे. देशात उद्योगधंदे वाढले पाहिजेत. डॉ. आंबेडकरांनी औद्योगिकीकरणाचा हिरिरीने पुरस्कार केला. आधुनिकतेचे ते खंदे समर्थक होते. विकसित देशांतील देदीप्यमान प्रगतीची त्यांना कल्पना होती. त्यांना बहुद्देशीय विकास हवा होता. विकासाची चाके ही विजेशिवाय फिरू शकत नाहीत, म्हणून त्यांनी वीजनिर्मितीवर भर दिला. शेतीचे सिंचन केल्याशिवाय देश सुजलाम, सुफलाम होणार नाही, म्हणून त्यांनी धरणांवर भर दिला. नद्यांवर मोठमोठी धरणे बांधल्याशिवाय पुरावर नियंत्रण ठेवता येणार नाही, सिंचनाखाली शेतजमिनी आणता येणार नाहीत आणि वीजनिर्मितीही करता येणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते.