मराठ्यांचे औरंगाबादेवर आक्रमण (फेब्रुवारी, १६८१)
बहादुरखानाने औरंगाबादेपासून सोळा कोसांवर बाबुळगाव येथे आपली छावणी केली. रात्रीचा एक प्रहर राहिला असता बातमी आली, की मराठे हे अहमदनगर आणि मुंगीपैठण या मार्गाने येत असून औरंगाबादेवर हल्ला करण्याचा त्यांचा हेतू आहे. बहादुरखानाने त्याचवेळी निघण्याची तयारी केली. बाजारबुणगे मागाहून आणण्याची त्यांने ताकीद केली. त्याच्या रक्षणासाठी त्याने थोडे सैन्य मागे ठेवले आणि तो दुपारी तातडीने निघून औरंगाबादेस पोहोचला. तो इतका तातडीने आला नसता तर अनर्थ ओढवला असता. बाईजीपुऱ्याच्या उपनगरात आणि जवळील सातारच्या खेड्यात मराठ्यांचे सैन्य जमले आहे अशी बातमी आली. राजा अनुपसिंग हा तयार होऊन आपल्या पुऱ्यातच उभा राहिला. पुढे चाल करून जाणे त्याच्याने शक्य होईना. बहादूरखान हा तातडीने पोहोचला; पण तो येण्यापुर्वीच मराठे हे बाईजीपुऱ्यापर्यंत चाल करून आले होते. त्यांनी तेथे पूर्वी धामधूम माजवली. पण बहादूरखानाशी युद्ध न करता ते निघून गेले. बहादूरखानाने जसवंतसिंगाच्या तलावाच्या काठावर आपला तळ दिला.
माझ्याबरोबर बायकामाणसे होती. मी मध्यान्हाच्या वेळी औरंगाबादेत दाखल झालो. मला जे दृश्य दिसले ते विलक्षण होते. लोकांनी आपापल्या घरांचे दरवाजे बंद केले होते. ते आपापल्या वाड्यात तयार होऊन उभे होते. बाजारात आणि गल्यांतून एक मनुष्य दिसत नव्हता. कोतवालीच्या ओट्यावर मला फक्त तीन शिपाई बसलेले आढळले. माझा चुलतभाऊ हरराय आणि इतर नातेवाईक हे औरंगाबादेत होते. माझ्या येण्याने ते निश्चिंत झाले.