बालमित्रांनो, 'चिमुकल्यांची चिवचिव' हे संगीतमय बालगीतांचे पुस्तक मी खास तुमच्यासाठी लिहिले आहे. मला खात्री आहे, या पुस्तकातील बालगीते तुम्हाला खूप आवडतील. मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे. ते भरपूर जगायला हवे. निसर्गाच्या सान्निध्यात जायला हवे. आपल्या पर्यावरणाचे रक्षण करायला हवे. मैदानी खेळ खेळायला हवेत. आई-वडिलांचा आदर करायला हवा. वडीलधाऱ्या लोकांशी विनम्रपणे वागायला हवे आणि मित्रांसोबत आपुलकीने.
मित्रांनो, आपले आरोग्य ही आपली संपत्ती आहे. वाईट सवयींपासून दूर रहावे. चांगल्या सवयींचा स्वीकार करावा. नेहमी घरचे जेवण खावे. बाहेरचे खाणे शक्यतो टाळावे. चांगल्या गोष्टींचा नेहमी आग्रह धरायला हवा आणि वाईट प्रवृत्तींना विरोध देखील करायला हवा. नेहमी चांगल्या मित्रांच्या आणि चांगल्या लोकांच्या संगतीत रहावे.
टी. व्ही. वर इतर कार्यक्रमांच्या बरोबरच बातम्याही पहाव्यात आणि ऐकाव्यात. आपला आत्मविश्वास नेहमी उंच ठेवावा कारण आत्मविश्वास ही आपली सर्वात मोठी ताकद असते.