धर्म' ही मानवाच्या मनात खोलवर रुजलेली अशी एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. काही मोजक्या व्यक्तींचा अपवाद वगळता इतर बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने धर्म हा एक मोठा मानसिक आधार असतो. धर्म ही त्यांच्या जीवनाची एक नियंत्रक शक्ती असते. धर्म त्यांच्या जीवनशैलीचे स्वरूप ठरवतो, त्यांच्या जीवनक्रमाला दिशा देतो. माणूस म्हणून स्वतः कसे जगावे आणि इतरांशी कसे वागावे, याविषयी तो त्यांना मार्गदर्शन करतो. विशिष्ट समाजाचे आचार-विचार, तत्त्वज्ञान, पुराणकथा, साहित्य, इतर कला, कर्मकांड, सण, उत्सव अशा सर्व सांस्कृतिक क्षेत्रांवर प्रभाव गाजवण्याचे काम धर्म करतो. याचा अर्थ कोणाही माणसाच्या 'स्व'ची रचना तपासून पाहिली, तर तिच्यामध्ये त्याच्या धर्माने निर्माण केलेले विविध घटक फार फार महत्त्वाचे असल्याचे आढळते, हे स्पष्ट आहे.