नारायण खानसोळे यांची 'गंगथडी' ही कादंबरी विलोभनीय अशा कृषी संस्कृतीचा जिवंत आविष्कार करते.
गंगथडी म्हणजे गोदाकाठच्या परिसरातील शेतीवर जगणाऱ्या माणसांची जीवनरीत. 'कोणाचं हाबाळून गबाळून घेऊ नव्हं', 'वाटंत सोनं पडलं तरी उचलू नव्हं' ही शेतात राबणाऱ्या ज्येष्ठांची नैतिक जीवनरीत फार सुंदर आणि मूल्यमय आहे.
खेड्यातील कृषीनिष्ठ कुटुंब या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. विविध वृक्षराजींनी नटलेला गोदाकाठचा निसर्ग तसेच शेतीमाती आणि शेतीमध्ये राबणारे प्राणी यांच्यावर जिवापाड प्रेम करणारी निरागस माणसं या कादंबरीतून भेटतात. त्याचबरोबर मातीतून मोती पिकवण्यासाठी राबता राबता शेतकऱ्याची कशी रायटाळ होते, याचा जिवंत प्रत्ययही ही कादंबरी देते.
अस्सल ग्राम बोलीचा नेमका वापर हे या कादंबरीचं खास वैशिष्ट्य आहे. निजामी राजवटीच्या प्रभावात व शीख धर्माच्या गुरुगोविंद सिंग यांच्या जीवनरीतीच्या सहवासात असलेल्या वासरी या गावाची मायबोली एका आगळ्याच भाषिक सौंदर्याने नटलेली आहे. संमिश्र संस्कृतीतील म्हणी, वाक्प्रचार व प्रतिमा प्रतीकांचा वापरही या कादंबरीत फार चांगल्या पद्धतीने केलेला आहे.'गंगथडी' ही कादंबरी मराठीतील ग्रामीण कादंबरीच्या अनुभव कक्षा रुंदावणारी आहे. वाचक या कादंबरीचे नक्कीच स्वागत करतील.