मर्द मराठा या पुस्तक शृंखलेतील पहिल्या भागात हंबीरराव : खंबीर सरनौबताचा तेजस्वी इतिहास यात स्वराज्याशी निष्घ्य, समर्पण भावनेने जीवन जगलेल्या महान योद्ध्याचा जीवनपट आहे. हंबीरराव मोहितेंचा अगदी बाल्यावस्थेपासून भोसले घराण्याशी जवळचा संबंध राहिला आहे. शहाजीराजे, जिजाऊसाहेब आणि शिवबा यांच्या कार्याने भारावलेल्या हंबीरने छोट्या वयात स्वराज्याच्या वाटेने मार्गक्रमण केले. कोणत्याही पदाची इच्छा न बाळगता ते निःस्वार्थपणे सेवारत राहिले. महाराजांच्या प्रत्येक मोहिमेत भीम पराक्रम गाजवीत डोळ्यात भरणारी कामगिरी बजावली.
रामराज्य उभे राहण्यासाठी वीर हनुमंत जसे खंबीरपणे प्रभू रामचंद्रांच्या पाठीशी राहिले तसेच हंबीररावांनी शिवराज्यात हनुमंत होऊन, तर शंभू राजेंचे मार्गदर्शक सारथी होऊन श्रीकृष्णाची भूमिका बजावत स्वराज्याची दीर्घकाळ अविरत सेवा केली. हंबीरराव दोन छत्रपतींमधला अभेद्य दुवा ठरले.
सर्व बलाढ्य परकीय शक्तींशी आणि स्वराज्य पोखरू पाहणाऱ्या स्वकीयांशी एकाचवेळी लढा देणारा आणि त्यांना सपशेल शरणागती पत्करायला लावणाऱ्या शंभूराजेंसोबत त्यांचे सावत्र मामा हंबीररावांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. सरनौबत या नात्याने हंबीररावांनी दोन छत्रपतींच्या काळात केलेल्या गोवा मोहिमांचा विस्तृत आढावाही येथे घेतला आहे. त्या तेजस्वी खंबीर, कर्तृत्ववान, समरधुरंधर मर्द मराठा सरलष्कराचे जीवन चरित्र या ग्रंथाच्या माध्यमातून आपणा समोर ठेवत आहे.