'कुलतारा' हा राजेंद्र पवार यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह. यात एकूण बारा कथा संग्रहित केल्या आहेत. त्यांपैकी पहिल्या कथेचे शीर्षक 'कुलतारा' हे आहे व तेच शीर्षक या कथासंग्रहालाही दिलेले आहे. एखाद्या दूरदर्शन मालिकेचे किंवा चित्रपटाचे शीर्षकगीत (टायटल साँग) जसे त्या मालिका वा चित्रपटाचे मर्म (थीम) सांगणारे असते, तसेच या कथासंग्रहाचेही आहे. 'कुलतारा' या पहिल्याच कथेतून कथालेखकाला नेमके काय सांगायचे आहे, याचा अंदाज वाचकाला येतो. 'कुलतारा' हा शब्द मराठी साहित्याला परिचित नाही. परंतु त्याच्या उच्चारातूनच तो 'कुलदीपक' या शब्दाचा पर्याय असावा, याची चुणूक लागते. मुलाचा जन्म हा कुळाचा उद्धार करण्यासाठीच असतो, अशी परंपरागत समजूत आहे. त्यामुळे नकळतच मुलीच्या जन्माकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोण तयार झालेला आहे. हा दृष्टिकोण बदलावा याचसाठी लेखकाने या शब्दाची निर्मिती केली असावी, असे वाटते. मुलाच्या जन्माप्रमाणेच 'मुलीच्याही जन्माचे स्वागत करावे' असा संदेश या कथेतून लेखकाने दिला आहे.