प्रसिद्ध हिंदी कवी कुँवर नारायण यांची ‘कुमारजीव’ ही दीर्घ ललित काव्यरचना. दीड हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेले महान विद्वान, अनुवादक ‘कुमारजीव’ यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे हे काव्य. कुँवर नारायण यांच्या दृष्टीने ‘बुद्धांच्या विचारांचा काळ’ स्थायी आहे. काळाने जितके बुद्धांना घडवले त्यापेक्षा कितीतरी पटींनी बुद्धांनी आपल्या काळास घडवले. अर्थात, त्यांनी एक युग घडवले. ‘कुमारजीव’ यांचे कार्य असामान्य आहे. ‘कुमारजीव’ यांनी बुद्ध आणि नागार्जुन यांचा काळ जिवंत राखण्यात खूप मोलाचे योगदान दिलेले आहे.
बुद्धांच्या शिकवणींचे चिनी भाषेतील अनुवाद दुसऱ्या ते तेराव्या शतकांच्या दरम्यान झाले. एकूण विविध सूत्रांच्या अंदाजे सहा ते सात हजार आवृत्ती त्या काळी
चीनमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांचे चिनी भाषेत अनुवाद केले गेले. ‘कुमारजीव’ हे चौथ्या-पाचव्या शतकातील प्रमुख अनुवादकांपैकी एक मानले जातात. सम्राटांनी ‘कुमारजीव’ यांचा ‘राष्ट्रीय उपदेशक’ म्हणून गौरव केला होता. ‘कुमारजीव’ आणि त्यांचे शिष्य यांनी अकरा वर्षांमध्ये बौद्ध सूत्रे, भाष्ये आणि इतर ग्रंथांसह ३८४ खंडांचा अनुवाद केलेला आहे.या अनुवादकार्यामुळे ‘कुमारजीव’ यांनी चिनी बौद्ध धर्मात क्रांती घडवून आणल्याचे दिसून येते.