या चक्राची गती भयंकर
यापूर्वीच्या शतकांचा विश्वासही बसणार नाही, अशा विलक्षण गतीने, एका संपूर्ण नव्या पद्धतीने, गेल्या शतकात, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान यांनी मानवी जीवन पूर्णपणे बदलून टाकले. या तंत्रज्ञानाने कळत नकळत धर्म, कुटुंब, राजकीय व्यवस्था या सर्व जुन्या रचना कालबाह्य ठरवल्या.
या सर्वांचा धावता आढावा घ्यायचा म्हटला तरीही आपल्या मनावर दडपण येते. मात्र या पुस्तकात केवळ ७० पानात, 'कटोरी में गंगा' किंवा 'घागर में सागर' याप्रमाणे हे सारे साध्या, सोप्या, सरळ, सुंदर, प्रभावी भाषेत सांगतलेले आहे. हा खरोखर शिवधनुष्य एका हाताने उचलण्यासारखा प्रकार आहे आणि तो अगदी सहजपणे केला आहे वयाची ९० वर्ष उलटलेल्या आणि आजही अगदी सहजपणे नव्या विषयाला हात घालणाऱ्या डॉ. शरद अभ्यंकर यांनी ! गेल्या दोन वर्षात 'भारतातील प्रमुख धर्म' हे पुस्तक आणि 'देव का नाही?' या पुस्तकाचा सुबोध अनुवाद ही त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. या त्यांच्या नव्या पुस्तकाचे आणखी एक विशेष आहे. मराठी पुस्तकांच्या बाबत विश्वासही बसू नये अशी गोष्ट. जवळजवळ प्रत्येक पानावर ते तंत्रविज्ञान, त्या रचना, त्या व्यक्ती सहजपणे डोळ्यासमोर उभी करणारी सुंदर छायाचित्रे आहेत. याला अपवाद आहेत फक्त ७० पैकी फक्त ७ पाने !
हे पुस्तक अगदी सहजपपणे गेल्या शतकात विलक्षण गतीने बदललेले मानवी जीवन, तो काल, त्या व्यक्ती सगळे अगदी सहजपणे आपल्या डोळ्यासमोर उभे करते. आपले जीवन अधिक समृद्ध बनवते. - कॉफी बुक म्हणून घरात, दिवाणखान्यात कुणाच्याही हातात सहज पडेल असे. त्याचप्रमाणे आपण अभ्यासावे, चिंतन करावे आणि आपल्या पुस्तकांच्या संग्रहात ठेवावे असे हे पुस्तक. हे पुस्तक, त्यातील माहिती, आपल्या पुढील पिढ्यांना एक समृद्ध खजिना वाटेल.