कॉ. शरद् पाटील, भारतीय अब्राह्मणी विचारविश्वातले एक देदीप्यमान बेट. ब्राह्मणी छावणीत घुसून थेट त्यांच्या तात्त्विक पायाला हात घालून त्याला डळमळीत करणे हा साधा विद्रोह नव्हता, तर महाविद्रोह होता. शपांच्या इतर कोणत्याही पैलूंपेक्षा ज्ञानाची असीम लालसा, निर्मितीशील विद्रोहाच्या पवित्र्यात उभं राहून जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताचा त्यांचा सततचा उद्घोष आणि संपूर्ण देहबोलीतून प्रकटणारा असंतोष हे पैलू चिरस्मरणीय राहतील. संघर्ष तात्त्विक असो की संघटनात्मक, ते कधीच साध्या व्यक्तीच्या नादी लागले नाहीत. यावरूनही त्यांचे असामान्यत्व लक्षात यावे. आपला शत्रू बलाढ्य आहे, मात्र तो असत्याच्या पायावर उभा आहे. हे जरी खरे असले तरी आपल्याला त्याच्यापेक्षा अधिकचे सामर्थ्य प्राप्त करणे आवश्यक आहे. हे त्यांनी फार लवकर ओळखले आणि त्या दिशेने ते आयुष्यभर धावत राहिले. ज्ञानाच्या क्षेत्रातले सर्वोच्च असे दीपस्तंभ बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती, वसुबंधू, मार्क्स, जोतिबा आणि बाबासाहेब हे त्यांचे प्रेरणापुरुष असल्यामुळे शॉर्टकटच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत. त्यामुळेच ते पाच हजार वर्षांच्या भारतीय संस्कृतीचे उत्खनन करून पर्यायी अशा ज्ञानाची मांडणी करू शकले. त्यातून त्यांनी आशयघन अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आणि या ग्रंथांतून दही घुसळून लोण्याचा गोळा बाहेर यावा त्याप्रमाणे अब्राह्मणी सिद्धांतांची प्रस्थापना झाली...